सावित्रीबाई फुले | Savitribai Phule

 

स्त्री मुक्ती आंदोलनाच्या अधर्वयू – सावित्रीबाई फुले

 

आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर विराजमान होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धामय जगात तरुण जाण्यासाठी स्वतःची कार्यक्षमता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काळाच्या प्रवाहात धावणे गरजेचे आहे. आजच्या स्त्रीला समाजात कार्यक्षम बनविणे व त्यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे याची जाणीव म. फुल्यांना झाली होती म्हणून त्यांना १८४८ ला पुण्यात भिडे वाड्यात मुर्तीची शाळा काढली. या शाळेची अध्यापिका म्हणून पहिले पाऊल टाकून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ सावित्रीबाईंनी रोवली.

स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देत असतांनाच स्त्रियांना संघटीत केले. या संघटनेत बालविवाह, विधवा पुनर्विवाह, सतीची चाल या गंभीर विषयावर चर्चेच्या रुपाने विचार मंथन घडवून आणले जाई. म्हणूनच सावित्रीबाई स्त्री मुक्ती आंदोलनाच्या मार्गदर्शिका ठरल्या. या आंदोलनाचे फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने ३ जानेवारी हा

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून मान्य केला आहे. सावित्रीबाईंनी ज्ञानार्जन करण्याच्या जिज्ञासेतूनच स्वतः शिक्षित होऊन

सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती

अध्यापनाचे कार्य केले. अध्यापनाचे कार्य करतांना रस्त्यावर शेणगोळे अंगावर झेलणे, धींगणाची अडवणूक दूर करण्यासाठी सिंहीणीचे बळ प्राप्त झाले, हे बळ त्यांना पतीच्या सहकार्यामुळेच मिळाले. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या अंगी धडाडी, कर्तव्य तत्परता आणण्यात पुरुषांचा भक्कम पाठींबा असतोच. शिक्षण क्षेत्रातील सावित्रीबाईंचे योगदान मान्य करुनच महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवून शिक्षण क्षेत्रातील सेवा कृतज्ञ बुध्दीने मान्य केले. शिक्षण क्षेत्रातील विचार म्हणजे सावित्रीबाई हया ज्योतिबा फुल्यांच्या शैक्षणिक विचाराची प्रयोगशाळाच म्हणवे लागेल. व्यासांचे महाभारतातील विचार, श्रीकृष्ण गीतेतील विचार आणि गीतेवरील भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांचे विचार हे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांच्या समकक्षच म्हणावे लागतील.

स्त्री शिक्षण प्रसार कार्यातील फुले दांपत्याच्या योगदानामुळे इंग्रजसरकारच्या वतीने मेजर कैंडी यांनी म.फुल्यांचा सत्कार केला त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना म. फुल्यांनी सत्काराचे श्रेय सावित्रीबाईंना देऊन मी शाळा स्थापन करण्यास निमित्तमात्र आहे पण तू अनेक संकटांना तोंड देऊन शाळा यशस्वीपणे चालवल्याचा मला अभिमान वाटतो. असे म्हटले. यावरुन स्पष्ट होते की, म. फुल्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच सावित्रीबाई स्त्रि जीवनविषयक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु शकल्या. तत्कालिन सामाजिक स्थितीवर मनुस्मृती ग्रंथाचे प्राबल्य होते. या ग्रंथाचा आशय स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्तीचा मारेकरी होता, कारण त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की,

पिता रक्षति कौमार्यो, पती रक्षति यौवने

पुत्रा रक्षति वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हता || एकंदरित मनुस्मृती ग्रंथानुसार स्त्री जन्मापासून जीवनाच्या अंतापर्यंत पुरुषी मक्तेदारीवरच अवलंबून आहे, पण सावित्रीबाईंनी सर्व समाजाला स्वकर्तृत्वाने पटवून दिले की, स्त्री स्वबळावर स्वतःचे रक्षण धैर्याने करु शकते. आज संसार रथाची चाके स्त्री-पुरुष दोघेही समानतेने व सारख्याच योग्यतेने ओढतांना आढळतात. यावरुन सावित्रीबाईंच्या स्त्री मुक्ती आंदोलनाचे फलित दिसून येते. सावित्रीबाईंना स्त्री स्वातंत्र्य मनः पुतं समाचरेत म्हणजे स्वैर वृत्तीने समाजात वावरणे अभिप्रेत नव्हते. तर विद्या विनयेन शोभते या न्यायाने शिक्षणाच्या संस्काराने कायापालट झालेली वृत्ती स्त्री मुक्ती आंदोलनातून अपेक्षित होती. स्त्री शिक्षण कार्याची धुरा सांभाळतांना त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि काळाची पावले ओळखुन स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडण्याची अनुकूलता दिसून आली. हा आत्मविश्वासच स्त्री मुक्ती आंदोलनाची नांदी ठरेल. स्त्री • शिकली की पापाचरणाकडे तिची प्रवृती बळावते या परंपरागत विचारसरणीला शाळेत जाऊ शिकू चला या कवितेच्या रुपाने • सावित्रीबाईंनी दिलेली चपराकच होती. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील अर्जुनाचा पांचजन्य

• शंखांचा शंखनाद शत्रूला गर्भगळीत करुन सोडणारा होता. त्याचप्रमाणे सनातन्यांच्या

बालेकिल्ल्यात असलेल्या पुण्याच्या भिडे वाड्यातील घंटानाद सनातन्यांच्या कर्मठ विचारांना

कायम स्वरुपी तडा देणारा ठरला.

१९ व्या शतकातील पेशवेकालिन स्त्रीजीवन अत्यंत निकृष्ट होते हे पेशवे बाजीराव यांच्या स्त्री लंपट व बदफैली असलेल्या ऐतिहासिक उदाहरणावरुन स्पष्ट होते. सावित्रीबाईंनी आपल्या पेशवाई कवितेत रंगविलेले स्त्रीजीवनाचे हृदयद्रावक चित्र दिसते त्या म्हणतात स्वपत्नीस धाडी निलाजरा पती ग

•तुला बोलवी राबाजी धनी ग

छळे ब्राम्हण ही अशी स्त्रैणशाही

मुखा बोलती ही जळो पेशवाई

सावित्रीबाई फुले

अस्पृश्यता मानणारे सनातनी लोक कामवासनेच्या तृप्तीसाठी तथाकथित निम्नस्थरातील स्त्रियांकडे जात तर आर्थिक विपन्नावस्थेतीन स्त्रिया या नराधमांच्या भूलथापांना बळी पडत आशा विपन्नावस्थेतील स्त्रियांच्या मुक्तीचा विडा सावित्रीबाईंनी उचलला होता.

सतीची चाल बंद करण्यासाठी त्या ठणकावून विचारित अनेक स्त्रिया सती गेल्याची उदाहरणे सांगता येतील पण एखादा पुरुष सता गेल्याचे उदाहरण तर ऐकिवात नाही. सतीची चाल बंद करणे बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बालाकाश्रम, बालविवाह, विधवा पुनर्विवाह व नाव्हयांचा संप, स्त्री संघटनांची स्थापना इ. समाजसुधारणांच्या माध्यमातून स्त्री मुक्ती आंदोलन केले. हे करतांना म. फुल्यांबरोबरच त्यांचे स्नेही मोशे विठ्ठल वाळवेकर यांनी १८७६ ला काढलेल्या इंदूप्रकाश वर्तमानपत्रातील लिखाणाद्वारे सहकार्य मिळाले. वर्तमानपत्रातून स्त्री शिक्षण कार्य व स्त्री उध्दार याबरोबर सावित्रीबाईंनी वाळवेकरांना गृहिणी नावाचे मासिक सुरु करण्याचा आग्रह केला. या मासिकातून सावित्रीबाईंनी स्त्री समस्या, जातीभेद निर्मुलन, स्त्री शिक्षणाचे महत्व, बालविवाहाचे दुष्परिणाम, शुद्रांच्या शिक्षणाचे महत्व इ. विषयावर लिखाण केले. यावरुन सावित्रीबाईंच्या स्त्री मुक्ती आंदोलनाचा आढावा येऊ शकेल. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना मुक्त करण्याचे अधिकार पुरुषवर्गाला असल्याने त्यांना विश्वासात घेवून त्यांचे हृदय परिवर्तन करण्यास यश संपादन केल्याशिवाय स्त्री मुक्ती आंदोलनाची सांगता होणार नाही म्हणून पुरुष वर्गाचे सहकार्य मोलाचे आहे कारण स्त्री ही पुरुषाची सहचारिणी असल्याने एकला चलो रे ही भूमिका एकांगी ठरेल. स्त्रीमुक्ती आंदोलनाला सक्रीय सहकार्य व वैचारिक पार्श्वभूमी म. फुल्यांचीच होती. स्त्री शिक्षणाची सुरुवात शाळेला अध्यापक मिळणे, त्या शाळेत अध्यापनाची सावित्रीबाईंचे मनोधैर्य वाढविणे इ. श्रेय म फुल्यांनाच जाते, म्हणून स्त्री मुक्ती आंदोलनाचा लढा म.फुल्यांना वगळून चालविणे शक्य नव्हते. आज स्त्री मुक्ती आंदोलनाला व्यापक स्वरुप आले. काळाच्या ओघात नविन समस्या निर्माण झाल्या. स्त्रीमुक्ती आंदोलनाला संघटित रुप प्राप्त करणे हे कार्य सावित्रीबाई शिवाय इतर कोणत्या स्त्रीने केले नसल्यामुळे स्त्रीमुक्ती आंदोलन लढण्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांच्याकडे जाते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने